Sunday, May 31, 2009

सलाम कृष्णाला !

महिनाभर "आयपीएल'' स्पर्धा गाजत होती. चांगला खेळ, चांगले खेळाडू बघायला मिळाले. खूप छान मनोरंजन झाले. पण त्याचबरोबर अमाप पैसा कसा खर्च होतो किंवा त्याची उलाढाल कशी होते, ते पाहायला मिळाले. इतका पैसा उतू गेला की परदेशातील शाळांना प्रत्येक मॅचमध्ये देणग्या देण्यात आल्या !
भारतात गेल्या वर्षीच्या "आयपीएल' मध्ये असे काही झालेले आठवत तरी नाही. असो, उद्योजक, कलाकार सगळे त्यात समरस झाले होते. आणि इथे मात्र पुण्यासारख्या शहरात कृष्णा पाटील नावाची धाडसी गिर्यारोहक एव्हरेस्ट हे जगातील अत्युच्च शिखर पार करण्याचे स्वप्न उराशी बाळगून, ते पूर्णत्वाला नेण्यासाठी काही लाख रुपयांच्या मदतीसाठी वणवण भटकत होती.
राजकीय नेत्यांनी निवडणुकीचे कारण सोयीस्करपणे पुढे करून आपला नाईलाज दर्शविला, कलाकारांना त्यात काही रस वाटला नाही, उद्योजकांपर्यंत पोच नव्हती. शेवटी आपल्या मुलीचे स्वप्न पूर्ण करायचेच या ध्येयाने कृष्णाच्या वडिलांनी सारस्वत बॅंकेकडून कर्ज घेतले आणि तिला या मोहिमेवर धाडले. २१ मे २००९ रोजी या धाडसी कर्तबगार मुलीने हे शिखर सर केले. देशातील दुसरी तरुण गिर्यारोहक मुलीचा मान तिने आपल्या शिरपेचात रोवला. पेपरात ही बातमी वाचताना मान अभिमानाने ताठ झाली, ऊर भरून आले. तिचा खडतर प्रवास वाचून खरंच या १९ वर्षीय युवतीचे कौतुक करावे तेवढे थोडेच !
एव्हरेस्टसारखे शिखर पार करण्याची मोहीम म्हणजे काही सोपी नाही. किती तयारी आणि परिश्रम घेतले असतील तिने. मी एनसीसीत असताना अगदी छोटे ट्रेक्‍स करायची. म्हणजे कृष्णाने केले त्यातले एक पाऊलच असेल माझे जेमतेम, पण तेवढे छोटे ट्रेक्‍स करतानासुद्धा आम्ही किती सराव, मेहनत घ्यायचो. रोज व्यायाम, क्रॉस कंट्री, चांगले डाएट यामुळे स्टॅमिना वाढवायचा. मग चढ- उताराची प्रॅक्‍टिस. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शिस्त स्वतःची, मोहिमेतील व बरोबरच्या सर्व ग्रुपची. त्यातच अर्धे यश मिळते, नंतर आहे तो कंट्रोल.
मनावर, सवयींवर, वागण्यावर, भावनांवर या समस्यांवर कंट्रोल ठेवायची सवय लावावी लागते. म्हणूनच गिर्यारोहक शारीरिकदृष्ट्या तर फिट असतोच, पण मानसिक तयारीही तितकीच महत्त्वाची. ऐनवेळी येणाऱ्या अडचणींवर कशी मात करायची याचे प्रशक्षण फार महत्त्वाचे. कृष्णाच्या मोहिमेत तर दोन ऍव्हलान्चचे अडथळे आले. सुदैवाने ती त्यातून सुखरूप वाचली, पण त्यांच्या ग्रुपमधील एक शेर्पा दगावला. आपल्या ग्रुपमधील कोणी असे जाणे म्हणजे एवढा मोठा मानसिक आघात असतो की पुढील प्रवास करण्याची जिगरच संपते.
आमच्या कुलू मनालीच्या एनसीसीच्या ट्रेकमध्ये रिव्हर क्रॉसिंग करताना असा एक कॅडेट वाहून गेला होता व नंतर त्याचे प्रेत मिळालेच नाही. केवळ त्याच्या हलगर्जीपणामुळे व शिस्त मोडल्यामुळे हा प्रकार घडला, पण बाकी ग्रुपवर एवढे दडपण आले की ते अजूनही आठवले तरी अंगावर शहारा येतो. पण कृष्णाने तिच्या मनाची तयारी केली होती हे अगदी दाखवून दिले. तिने सांगितले, "मी जेव्हा पीकवर पोहचले तेव्हाचा आनंद अवर्णनीय होता, पण तरीही मी मनाला पटवले, आताशी नुसते पीकवर पोहचलो आहोत, पण यानंतर उतार पूर्ण करून परत खाली पोहचायचे आहे. तेव्हाच मोहीम संपेल व तेव्हाच यशाचा आनंद मिळेल.'' खरंच किती परिपक्व विचार आहेत, शिवाय स्वतःच्या भावनांवर असा कंट्रोल ठेवून ध्येय गाठणे म्हणजे अपूर्वच.
तिचे प्रयत्न, मेहनत तर आहेच, पण तिच्या घरच्यांचा पाठिंबाही तिच्यासाठी महत्त्वाचा. त्यांच्या मोटिव्हेशन व सपोर्टमुळे ती हे स्वप्न पूर्ण करू शकली. तिच्या वडिलांनी मदतीचा हात पुढे आला नाही म्हणून न हरता, कर्ज काढून तिला एव्हरेस्टवर धाडले. शिवाय सारस्वत बॅंकेनेही ते कर्ज मंजूर केले, एवढेच नाही तर तिच्या यशामुळे, आनंदाने ते कर्ज माफही झाले ! खरंच कौतुकास्पद आहे. या मोहिमेत ज्या ज्या लोकांचा सहभाग होता, सहकार्य होते त्या सगळ्यांचा आम्हाला अभिमान आहे.
कृष्णा तुला असेच यश मिळो व एव्हरेस्टसारखीच तू जगातील सर्व शिखरे सर कर. एक मराठी मुलगी म्हणून आम्हाला तुझा अभिमान आहेच, पण आपल्या भारताचा तिरंगा अत्युच्च शिखरावर रोवून आलीस म्हणून तुला आम्हा सगळ्यांचा सलाम!
- अंजली भागवत

Labels: , ,

1 Comments:

At 10:02 PM, Blogger Abhijit Dharmadhikari said...

अंजली, कृष्णाबद्दल जे लिहिले आहे त्याला संपूर्ण अनुमोदन! सुंदर लेख!!!

 

Post a Comment

<< Home